दिनांक :- २५ मार्च २०१८

भावसरगममधून भावगीतांचा सुरेल नजराणा
प्रख्यात गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे आयोजित संगीत महोत्सवाचा समारोप

पुणे : केव्हा तरी पहाटे … गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे…येरे घना येरे घना…अशा विविध भावभावनांचे सुरेल चित्रण असलेल्या भावगीतांच्या सादरीकरणाने रसिकांना मराठी संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली. प्रख्यात गायक व संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर आणि गायिका मधुरा दातार यांनी भावगीतांचा सुरेल नजराणा रसिकांसमोर पेश केला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भावसरगम कार्यक्रमाने संगीत महोत्सवाची सांगता झाली.

कार्यक्रमात अवचिता परिमळू झुळकला अळू मळू …या संत ज्ञानेश्वरांची रचना असलेल्या गीताने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. यानंतर शांता शेळके यांनी लिहिलेल्या ही वाट दूर जाते… या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. माझ्या सारंगा राजा सारंगा… या कोकणातील समुद्र आणि पौर्णिमेच्या चांदण्यांचे वर्णन असलेल्या गीताचे राधा मंगेशकर यांनी सादरीकरुन रसिकांनी विशेष दाद मिळविली. माजे रानी माजे मोगा… या शांता शेळके यांची रचना असलेल्या महानंदा चित्रपटातील गीताच्या सादरीकरणाने पं. ह्रदयनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांनी कोकणी भाषेतील गोडवा रसिकांसमोर उलगडला. विवेक परांजपे, दर्शना जोग (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली.

माध्यम समन्वयक :-
ग्लोबल मीडिया, पुणे – मो. ९०२८७८७०५८, ९०२८४२६३४५

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भावसरगम कार्यक्रमात सादरीकरण करताना पं. ह्रदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आणि मधुरा दातार.