दिनांक :- २५ जून २०१८

ध्येयवेडे विद्यार्थी असतील तर चांगला समाज घडेल डॉ.शकुंतला काळे यांचे मत; श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन ; शालेय साहित्य वाटप

पुणे : अभ्यासक्रमात अनेकदा कालसुसंगत बदल करावे लागतात. प्रश्नपत्रिकेकडून कृतीपत्रिकेकडे जाण्यासाठी काही बदल आवश्यक असतात. विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानार्थी न बनविता शाळेत घेतलेले ज्ञान शाळेबाहेर पडल्यावर देखील उपयोगी पडले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कल्पनेतून नाही तर कष्टातून स्वप्ने बघावी. आपली स्वप्ने पूर्ण करायला कष्टाशिवाय पर्याय नाही. समाजाच्या प्रत्येक स्तरावर ध्येयवेडे विद्यार्थी असतील तर चांगला समाज घडेल, असे मत एस. एस. सी. बोर्डाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. ट्रस्टतर्फे या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन भरत नाट्य मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रा. श्याम भुर्के, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. अ. ल. देशमुख, अरुण भालेराव, राजाभाऊ सूर्यवंशी, डॉ. संजीव डोळे आदी उपस्थित होते.
डॉ. शकुंतला काळे म्हणाल्या, समाजाची निर्मिती ज्यापासून होते त्या भावी पिढीला घडविण्याचे काम महत्त्वाचे आहे. अनेकांना बुध्दीमत्ता असून देखील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे स्वप्न पाहता येत नाहीत. परंतु अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक उभारी देऊन त्यांच्या स्वप्नांना अर्थ देण्याचे काम ट्रस्टने केले आहे.
प्रा. श्याम भुर्के म्हणाले, आयुष्यात मोठे माणूस बनण्यासाठी प्रथमत: मातृभाषेत व्यवस्थित बोलता आले पाहिजे, त्यानंतर इंग्रजी आले पाहिजे, संगणकाचे ज्ञान असले पाहिजे, पदवीधर असले पाहिजे, व्यवस्थापन जमले पाहिजे या सगळ्या गोष्टी असतील तर नक्कीच माणूस पुढे जातो.
अशोक गोडसे म्हणाले, समाजातील आर्थिक परिस्थिती नसलेले तसेच उपेक्षित घटक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना आठ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली. या योजनेद्वारे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, परंतु बुध्दीमत्ता असलेल्या विद्याथर््यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले जाते.
दहावीत यश मिळविलेली गौरी खटावकर म्हणाली, मी इयत्ता तिसरीत असल्यापासून या योजनेचा भाग आहे. योजनेअंतर्गत चालणा-या अध्ययन विभागाचा मला उपयोग झाला. शिक्षकांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझ्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळाला तसेच माझ्यातील आत्मविश्वास वाढला. मला भविष्यात चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे आहे. हे स्वप्न मी केवळ ट्रस्टमुळे पाहू शकत आहे, असेही ती म्हणाली. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन भरत नाटय मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविलेले गुणवंत विद्यार्थी व मान्यवर.