दिनांक :- २३ सप्टेंबर २०१८

dagdusheth ganapati
‘दगडूशेठ’ च्या बाप्पांची २१ फुटी श्री विश्वविनायक रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १२६ वे वर्ष

स्वरुपवर्धिनी पथकासह बालवारक-यांची गणरायाला मानवंदना

पुणे : मोतिया रंगांच्या २७ हजार दिव्यांनी उजळलेल्या श्री विश्वविनायक रथात विराजमान होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची वैभवशाली सांगता मिरवणूक बेलबाग चौकातून निघाली आणि तो क्षण अनुभवण्याकरीता हजारो गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण रथावर लावण्यात आलेल्या २२५ आकर्षक झुंबरांनी मिरवणुकीच्या वैभवात आणखीनच भर घातली. त्याचबरोबर स्वरुपवर्धिनी ढोल ताशा ध्वज पथक आणि बालवारक-यांनी गणरायाला पारंपरिक पद्धतीने दिलेली मानवंदना हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी आयोजित सांगता मिरवणुकीला रविवारी रात्री ११ वाजून ०५ मिनिटांनी बेलबाग चौकातून प्रारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनिल रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, सचिन आखाडे यांसह हजारो कार्यकर्ते पारंपरिक वेशात सांगता मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मिरवणुकीच्या अग्रभागी पर्यावरण रथातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. हरित वारी आणि राज्य महामार्गावर ५० लाख वृक्ष लावण्याच्या उपक्रमाची माहिती देखील देण्यात आली होती. तसेच ट्रस्टचे मानवसेवेचे विविध उपक्रम देखील दाखविण्यात आले. यावेळी विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बँड, प्रभात बँड आणि स्वरुपवर्धिनी पथकासह बालवारकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
लक्ष्मी रस्त्यावरुन बाप्पाची मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी गणपती बाप्पा मोरच्या जयघोषाने गणरायाला नमन करण्यात आले. सोमवारी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी टिळक चौकात रथाचे आगमन होताच हा क्षण डोळयात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी पांचाळेश्वर घाट येथे पर्यावरणपूरक पद्धतीने हौदात मूर्तीचे विसर्जन करुन गणरायाला निरोप देण्यात आला.

*श्री विश्वविनायक रथ पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी
दगडूशेठ गणपतीच्या सांगता मिरवणुकीच्या श्री विश्वविनायक रथावर ८ खांब असून आकर्षक नक्षीकाम असलेल्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी होती. रथावर रेखीव रंगीबेरंगी कोरीवकाम असलेले ५ कळस बसविण्यात आले होते. तर, खांबांवर विष्णू, शक्ती, गंगा, गजविराल यांच्या मूर्तींची कलाकुसर गणेशभक्तांनी डोळ्यांमध्ये साठविण्याकरीता गर्दी केली. संपूर्ण रथावर तब्बल २२५ आकर्षक झुंबर लावण्यात आली असल्याने अनेकांनी ते नेत्रदिपक क्षण आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये टिपले.

फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकीत श्री विश्वविनायक रथात विराजमान दगडूशेठचे गणपती बाप्पा.