दिनांक :- २३ मार्च २०१८

… अन् उलगडली मराठी चित्रपटांच्या इतिहासाची सुवर्णपाने
गायन, नृत्य व चित्रफितीद्वारे उलगडला प्रभात ते सैराटचा चित्रप्रवास ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन

पुणे : अयोध्येचा राजा चित्रपटापासून सामना चित्रपटापर्यंत… अशी ही बनवाबनवी चित्रपटापासून जोगवापर्यंत… नटरंग चित्रपटापासून ते अगदी अलीकडच्या सैराटपर्यंत… अशा जुन्या- नवीन चित्रपटांच्या चित्रप्रवासाचा नेत्रसुखद अनुभव रसिकांनी घेतला. दिग्दर्शन, लेखन आणि संगीताचा उत्कृष्ट मिलाफ रसिकांसमोर ठेवणा-या दिग्गजांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू यानिमित्ताने समोर आले. प्रभात ते सैराट या कार्यक्रमातून गायन, नृत्य, चित्रफितींद्वारे मराठी चित्रपटांच्या इतिहासाची सुवर्णपाने रसिकांसमोर उलगडली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये प्रभात ते सैराट चित्रप्रवास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मराठी चित्रपटांची आजपर्यंतची वाटचाल आपल्या निवेदनातून रसिकांसमोर मांडली. संत तुकाराम चित्रपटातील आधी बीज एकले… कुंकू चित्रपटातील मन सुद्ध तुझ… माणूस चित्रपटातील कशाला उद्याची बात… अशा गीतांच्या सादरीकरणातून मराठी चित्रपटाचे मानाचे पान असलेल्या प्रभातच्या कालखंडाने रसिक जुन्या काळात रमून गेले.

कौटुंबिक चित्रपटांनंतर तमाशाप्रधान चित्रपटांची मराठी चित्रपटसृष्टीत आलेली लाट… धुमधडाका, थरथराट, अशी ही बनवाबनवी अशा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्या करमणूकप्रधान चित्रपटातील गीतांच्या, त्यातील प्रसंगांच्या दाखविलेल्या चित्रफितीने रसिक खळखळून हसले. अग बाई अरेच्चा , जोगवा, नटरंग, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली अशा अलीकडच्या काळातील वेगळे विषय घेऊन साकारलेल्या चित्रपटातील गीते, दृश्य, नृत्य यांच्या सादरीकरणाने रसिक भारावून गेले.

कार्यक्रमाची निर्मिती मिलिंद ओक यांनी केली असून ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, गायक जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, मृण्मयी तिरोडकर, योगिता दामले, मोहिका दामले यांसह अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात सादरीकरण केले. तसेच झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये प्रभात ते सैराट चित्रप्रवास कार्यक्रमात सादरीकरण करताना कलाकार.