दिनांक :- २३ जून २०१९

dagdusheth ganapati
दगडूशेठ गणपतीला माऊलींच्या अश्वांची थेट सभामंडपात मानवंदना
सलग तिस-या वर्षी गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश; पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन

पुणे : माऊली माऊली… गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली. सलग तिस-या वर्षी माऊलींच्या मानाच्या अश्वांनी गणेश मंदिराच्या सभागृहात प्रवेश केला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त व पुणेकरांतर्फे अश्वांचे पूजन करीत विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.

कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), रामभाऊ चोपदार, दिंडी संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, अक्षय गोडसे, मंगेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, गजानन गोडसे, स्वप्निल फुगे, सुरेश कविटके आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन्ही अश्वांना चांदीचे हार पूजन करुन प्रदान करण्यात आले.

महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. तीन वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. परंतु सलग तिस-या वर्षी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही शेतक-यांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

महेश सूर्यवंशी म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. सलग तिस-या वर्षी हे अश्व दगडूशेठ गणपती मंदिराच्या सभामंडपात आले. ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात चांगली झाली असून रुग्णवाहिका, आरोग्यसेवा आणि वारक-यांकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकारच्या मालकीच्या दोन मानाच्या अश्वांचे आगमन झाले. गणेश मंदिराच्या सभामंडपात मानाच्या अश्वांनी सलग तिस-या वर्षी गणरायाला आगळीवेगळी मानवंदना दिली.

A012
A011
A009
A008
A007
A003
A004