दिनांक :- २३ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
‘दगडूशेठ’ ला मोग-यासह १ कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; मंदिरात मोगरा महोत्सव आणि अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

पुणे : मोग-याच्या फुलांची आकर्षक सजावट… चाफा, झेंडू, गुलाब, लिलीसारख्या फुलांनी सजलेला गाभारा आणि शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला मोग-यांसह १ कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले मंदिर आणि गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये हे क्षण अनेकांनी टिपले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे, शिरीष मोहिते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहका-यांनी पुष्परचना केली.
सोमवार (दि.२२) पासून या पुष्पसजावटीची तयारी तब्बल ३०० महिला व २५० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये १३०० किलो झेंडू, २३०० किलो मोगरा यांसह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले वापरण्यात आली. गोल रिंगांची झुंबरे आणि कमानी हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्टय होते.
मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकारांसह युवा वारक-यांनी देखील मोठया उत्साहाने सहभाग घेतला. श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

फोटो ओळ : श्रीरीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी १ कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक गणरायाला करण्यात आला. गणरायाचे विलोभनीय रुप.

DA05
DA09
DA07
DA01
DA10
DA11
DA04
DA08