दिनांक :- २२ नोव्हेंबर २०१८

dagdusheth ganapati
अन्नकोटातून २२१ मिष्टान्नांचा दगडूशेठ गणपतीला महानैवेद्य
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कळसापासून गाभा-यापर्यंत तब्बल २५ हजार दिव्यांनी सजले मंदिर

पुणे : बाप्पाभोवती विविध प्रकारच्या फळांची व भाज्यांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट मांडण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तब्बल २२१ प्रकारच्या मिष्टान्नांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला. तसेच यावेळी कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे २५ हजार दिव्यांनी मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला. कार्यक्रमाचे यंदा २० वे वर्ष होते.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल २२१ हून अधिक भाविकांकडून विविध प्रकारचे पदार्थ मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.


फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये २२१ हून अधिक मिष्टान्नांचा अन्नकोट आणि २५ हजार पणत्यांचा दीपोत्सव करण्यात आला.