दिनांक :- २२ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
‘दगडूशेठ’ गणपतीला शमा भाटे आणि शिष्यांची नृत्यवंदना
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त नृत्यकलाकारांचे सादरीकरण ; भाविकांची अलोट गर्दी

पुणे : सूर्यवंदना…गुरुवंदना…शिववंदना…रामवंदना… अशा विविध रचना संगीताच्या तालावर सादर करीत ज्येष्ठ नृत्यांगना पं.शमा भाटे आणि त्यांच्या शिष्यांनी दगडूशेठ गणपतीसमोर नृत्यवंदना सादर केली. संस्कृतमधील विविध पद्यांवर आधारलेल्या रचनांच्या सुरावटींवर देवीवंदना, कृष्णवंदना, नादवंदनेसह गणेशवंदना करीत कलाकारांनी गणरायाचरणी नृत्यसेवा अर्पण केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्यसादरीकरण करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नृत्यांगना पं.शमा भाटे यांसह त्यांच्या शिष्या अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, भार्गवी सरदेसाई, इशा नानाल, निकीता कराळे, शांभवी कुलकर्णी, नीरजा थोरात यांनी सादरीकरण केले.
पं. शमा भाटे म्हणाल्या, परमेश्वराच्या द्वारी नृत्य करण्याची इच्छा होती. परमेश्वरासाठी नृत्य ही आमची परंपरा सांगते. नृत्यशैलीचा उगम मंदिरात झाला. नृत्यातून आत्मिक शांती साधायची असते. ती शांती परमेश्वराच्या समोर नक्की मिळते. नृत्य ही प्रेक्षकांसमोर सादर करायची कला आहे. मात्र, परमेश्वर हे अंतिम सत्य आहे, त्यामुळे त्याच्याशी स्वत:ला जोडण्याचा आम्ही नृत्यातून प्रयत्न केला आहे. पुण्यातील अनेक मंदिरांमध्ये नृत्यसेवा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

* दगडूशेठ चा वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आज (दि.२३)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंगळवार, दिनांक २३ एप्रिल रोजी मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणरायाच्या मूर्तीला व मंदिरावर मोग-याच्या लाखो फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मोग-याची आरास मंगळवारी सायंकाळी ७ नंतर गणेशभक्तांना पाहण्याकरीता खुली राहणार आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नृत्यसादरीकरण करण्यात आले. यावेळी नृत्यवंदना देताना पं.शमा भाटे आणि त्यांच्या शिष्या.

S003
S001
S012
S011
S016
S013
S008
S007
S005
S004
S014
S010