दिनांक :- २१ मार्च २०१८

dagdusheth ganapati
लोककलांच्या माध्यमातून उलगडली महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा
अशोक हांडे व सहका-यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन

पुणे : अभंग, संतवाणीपासून संत एकनाथांनी समाजप्रबोधनासाठी रचलेल्या भारुडापर्यंत, जात्यांवरच्या ओव्या, शेतकरी नृत्य, शिवरायांची महती, दशावतार, पोवाडा, गोंधळ, कोळीनृत्य अशा गायन व नृत्याच्या माध्यमातून केलेल्या सादरीकरणाने रसिकांनी मराठी संस्कृतीचा बाज अनुभवला. अशोक हांडे व सहका-यांनी मंगलगाणी दंगलगाणी कार्यक्रमात लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा पुणेकरांसमोर उलगडली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अशोक हांडे व सहका-यांचा मंगलगाणी दंगलगाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात खेळ मांडियेला वाळवंटी घाई… संतभार पंढरीत… अशा अभंगांच्या सादरीकरणातून रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. विंचू चावला या भारुडाच्या सादरीकरणाला रसिकांनी विशेष दाद दिली. सुरु झालिया पेरण… या शेतकरी नृत्यातून शेतक-यांच्या परंपरेचे विलोभनीय दर्शन रसिकांना घडले. शूर आम्ही सरदार आम्हाला… म्यानातून उसळे तलवारीची पात… या गीतांच्या सादरीकरणातून शिवरायांचा इतिहास रसिकांसमोर उलगडला. जेजुरीच्या खंडेराया… उदे ग अंबाबाई… या गोंधळाच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. डोंगराचे आडून एक बाई चांद उगवला… टिमक्याची चोली बाई…. या कोळीनृत्यांच्या सादरीकरणावर रसिकांनी देखील ठेका धरला. ने मजसी ने परत मातृभूमीला… या गीताने रसिक देशभक्तीने जागृत झाले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सादरीकरण करताना कलाकार.