दिनांक :- २१ जून २०१८

श्री राजराजेश्वर मंदिरात विराजमान होणार ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिर साकारण्यात येणार आहे. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. यावर्षीच्या सजावटीच्या शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला.

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, दत्तोपंत केदारी, कुमार वांबुरे, उत्तमराव गावडे, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

अशोक गोडसे म्हणाले, सलग ७५ वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. तब्बल १२०० ते १६०० वर्षांपूर्वी असलेल्या मंदिराच्या स्थापत्यकलेचा उत्कष्ट नमुना भाविकांसमोर आणण्याचा सजावटीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्टयपूर्ण असणार आहे. गाभा-यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिद्धटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.
ते पुढे म्हणाले, श्री राजराजेश्वर मंदिराला तमीळ भाषेमध्ये बृहदेश्वर मंदिर किंवा बृहदीश्वर मंदिर असे म्हटले जाते. चोल राजवटीतील राजे राजराज चोल यांनी या मंदिराची निर्मीती केली असल्याने राजराजेश्वर मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर १३ मजली असून ६६ मीटर उंचीचे आहे. वास्तुकला, पाषाण आणि ताम्र शिल्पांकन, चित्रांकन, नृत्य, संगीत, आभूषण या कलांचे भांडार असा लौकिक असलेल्या या मंदिरामध्ये संस्कृत आणि तमीळ पुरालेखांचा अनोखा संगम आहे.
विवेक खटावकर म्हणाले, श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून ९० फूट उंची आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. सजावट विभागात ४० कारागिर दिवस-रात्र कार्यरत राहणार असून राजस्थानमधील कारागिर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून यामुळे भाविकांना सहजतेने दर्शन घेणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिर साकारण्यात येणार आहे. त्यानिमित्त सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात झालेल्या सजावटीच्या शुभारंभाच्या सोहळ्याला उपस्थित मान्यवर.