दिनांक :- २१ जुलै २०१९

dagdusheth ganapati सुख-दु:खामध्ये प्रत्येकाला पांडुरंगाचे ध्यान-
ह.भ.प.बाबामहाराज सातारकर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त हरिपाठावरील प्रवचनाचे आयोजन; पुणेकरांना विनामूल्य प्रवेश

पुणे : मन आणि बुद्धीमधील घाण मानवी शरीरातून बाहेर काढण्याकरीता हरिपाठ आहे. एकाग्र चित्ताने आपल्या मनामध्ये विठ्ठल असणे, ही धारणा आहे. त्याचे चिंतन करणे, त्यावर लक्ष केंद्रीत करणे म्हणजे ध्यान आहे. प्रत्येकाला सुख-दु:खामध्ये पांडुरंगाचे ध्यान असते. जी धारणा आपल्या मनामध्ये असते, तेच ध्यान आपल्यामध्ये कायम राहते, असे प्रवचनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर ते निरुपण करीत आहेत.

ह.भ.प.बाबामहाराज सातारकर म्हणाले, कोणतीही गोष्टी अवघड असेल तर माणूस त्याकडे प्रवृत्त होत नाही, त्यापासून निवृत्त होतो. त्यामुळे संतांनी फार मोठा विचार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत हरिपाठ लिहिला. ईश्वरी सत्तेला शेवटचा शब्द आत्मा आहे. आपण संतांना आत्मा म्हणत नाहीत, तर महात्मा म्हणतो. यातच संतांची महती समजते.

ते पुढे म्हणाले, तत्वाशी एकाग्र होणे, एकरुप होणे म्हणजे समाधी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, म्हणजे ते त्या तत्वाशी एकरुप झाले. आजही अनेकांना त्याचा साक्षात्कार होतो, कारण ती संजीवन समाधी आहे. अनेकांना याचा अनुभव येतो, त्यामुळेच दहा लाख लोक वारीमध्ये चालत जातात. आपल्यामधील आपलेपणाचा विसर आणि अस्तित्वाशी एकरुपात म्हणजेच समाधी.

माणसाला स्वत:च्या उद्धारासाठी हरिपाठ श्रवणाची किमान एक तासाची समाधी असणे उत्तम आहे. विठ्ठल कीर्तनामध्ये आहे, या भूमिकेतून कीर्तन केल्यास समाधीचा प्रत्यय येतो. यज्ञ, यागापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेळा हरिचे नामस्मरण केल्यास परमेश्वराची अनुभूती येईल. सध्याच्या कलियुगात पैशापेक्षा हरिपाठाला अधिक महत्व आहे.

हे प्रवचन दिनांक १९ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. महिनाभर सुरु राहणा-या या प्रवचनाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे चातुर्मास सोहळ्यानिमित्त ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर प्रवचनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यावेळी बोलताना ह.भ.प.बाबा महाराज सातारकर.

B07
B05