दिनांक :- २१ जुलै २०१९

dagdusheth ganapati ज्यांच्याकडून चांगले गुण मिळतील त्यांना गुरु मानावे
ज्येष्ठ शिक्षक एच.जी.भोसले यांचे मत; जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील विद्यार्थ्यांचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा उपक्रम

पुणे : गुरुजनांचा सन्मान करण्याकरीता गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आई-वडिल हे आपले पहिले गुरु. आपण समाजात काम करीत असताना आपल्या शिक्षकांसोबतच ज्यांच्याकडून आपल्याला चांगले गुण मिळतील त्यांना गुरु मानायला हवे. आपले प्रत्येकाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्तगुरुंनी देखील असे २७ गुरु केले, असे मानतात. गुरुंवर श्रद्धा ठेऊन कोणतेही काम केले तरी ते यशस्वी होते, असे मत आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ शिक्षक एच.जी.भोसले यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम शनिवार पेठेतील नविन मराठी शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकरीता काम करणा-या समुपदेशक मानसी जठार, प्रशिक्षक सुप्रिया सराफ, विजया काळे, गौरी कोराटे, शुभदा देशपांडे, विद्या अंबरडेकर आदी उपस्थित होते. डॉ.अ.ल.देशमुख आणि अरुण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे.

एच.जी.भोसले म्हणाले, गुरु हे आपल्या शिष्यांचे आयुष्य घडवितात. पूर्वी विद्यार्थी गुरुंच्या घरी किंवा आश्रमात जाऊन विद्या ग्रहण करीत असत. आपल्याकडे ६४ कला आहेत. त्यांपैकी जी कला आवडेल, ती कला विद्यार्थी आपल्या गुरुंकडून शिकत असत. व्यास हे भारतीय संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या गुरुंवर श्रद्धा ठेऊन काम करावे.

योजनेतील विद्यार्थी सिद्धार्थ दहिभाते म्हणाला, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाच्या प्रकाशाची ज्योत लावण्याचे काम गुरु करीत असतात. गुरु आणि शिष्याचे नाते हे देखील वेगळ्या प्रकारचे असते. आपल्या आयुष्यात येणा-या प्रत्येक व्यक्तीचे स्थान आपल्या मनात वेगवेगळे असते. मात्र, गुरुंचे स्थान आणि त्यांची आठवण आपल्याला नेहमीच येते, असेही त्याने सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम शनिवार पेठेतील नविन मराठी शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ शिक्षक एच.जी.भोसले. उपस्थित विद्यार्थी.

G003
G004
G001