दिनांक :- २० सप्टेंबर २०१८

dagdusheth ganapati
श्री विश्वविनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १२६ वे वर्ष

आकर्षक नक्षीकाम असलेला २१ फूट उंच रथ ; मिरवणुकीत हजारो गणेशभक्त होणार सहभागी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला रविवार, दिनांक २३ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री विश्वविनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून मोतिया रंगांच्या २७ हजार दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
श्री विश्वविनायक रथावर ८ खांब असून आकर्षक नक्षीकाम असलेल्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी आहे. रथावर रेखीव रंगीबेरंगी कोरीवकाम असलेले ५ कळस बसविण्यात आले आहेत. तर, खांबांवर विष्णू, शक्ती, गंगा, गजविराल यांच्या मूर्ती आहेत. संपूर्ण रथावर तब्बल २२५ आकर्षक झुंबर लावण्यात आली असून हे यंदाच्या रथाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. श्री विश्वविनायक रथ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या संकल्पनेतून शिल्पकार विवेक खटावकर यांनी साकारला असून झुंबराची संकल्पना शंकर मारणे आणि शाम वाईकर यांनी विद्युतरोषणाई करुन सलग १५ दिवसांच्या तयारीनंतर केला आहे.
सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना अशोक गोडसे म्हणाले, मिरवणुकीत पर्यावरण व मानवसेवा रथ असणार आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती लावण्यात येणार असून याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बँड, प्रभात बँड आणि स्वरुपवर्धिनी ढोल-ताशा-ध्वज पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. याशिवाय पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकीकरीता साकारलेला श्री विश्वविनायक रथ.