दिनांक :- २० मार्च २०१८

dagdusheth ganapati
पसायदान ते आधुनिक संगीतातून उलगडले स्वरांचे साम्राज्य
धनश्री लेले, प्रिती निमकर-जोशी, श्रीरंग भावे यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे संगीत महोत्सव

पुणे : तू बुद्धी दे, तू तेज दे… दत्ता हेची दान द्यावे…कोमल वाचा दे रे राम… यांसारख्या अजरामर गीतांमधून परमेश्वराकडे साकडे मागत रसिकांमध्ये स्वरभक्ती जागृत करण्यात आली. मागणे का मागावे, कोणाकडे मागावे, कशासाठी मागावे याचे विवेचन करीत धनश्री लेले व सहका-यांनी पसायदान, लोककला ते आधुनिक संगीत असा प्रवास पुणेकरांसमोर उलगडला. स्वरांचे साम्राज्य अनुभवित उपस्थितांनीही या कार्यक्रमाला भरभरुन दाद दिली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आयोजित कार्यक्रमात धनश्री लेले यांसह गायक श्रीरंग भावे, गायिका प्रिती निमकर-जोशी यांनी सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दे मला गे चंद्रिके… या गीतकार राजा बढे यांच्या गीताने रसिकांवर अधिराज्य गाजविले. वादक वर्गाने देखील संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्यामध्ये दिलेल्या संगीताचा हुबेहुब नजराणा पेश केला. माणसाला चंद्र व निसर्गाकडून जसे मिळते, तशी त्यांच्याप्रमाणेच देण्याची भावना प्रत्येकामध्ये रुजावी, असा आशय प्रत्येक गाण्यातून सांगितला जात होता.

शंकर वैद्य यांनी लिहिलेल्या स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला… या गीताप्रमाणेच लाखाची गोष्ट चित्रपटातील सांग तू माझी होशील का? सारख्या चित्रपटगीतापर्यंत विविधांगी गीते पुणेकरांनी अनुभविली. अमेय ठाकूरदेसाई (तबला), झंकार कानडे (सिंथेसायजर), अमित देशमुख (तालवाद्य), प्रसन्न बाम (संवादिनी) यांनी साथसंगत केली. धनश्री लेले यांनी निवेदन केले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सादरीकरण करताना धनश्री लेले, श्रीरंग भावे, प्रिती निमकर-जोशी आणि सहकलाकार.