दिनांक :- २० नोव्हेंबर २०१८

dagdusheth ganapati
मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळा थाटात
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; गणेश मंदिरापासून ते मंडईतील साखरे महाराज मठापर्यंत मिरवणूक

पुणे : मंगलाष्टकांचे सूर… राधे कृष्ण, गोपाल कृष्ण चा अखंड जयघोष… वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या पारंपरिक वेशातील महिला आणि श्रीकृष्णाची मूर्ती व तुलसीवृंदावन डोक्यावर घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुलसीविवाह सोहळा पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुलसी चरणी नतमस्तक होत, आपल्या मनोकामना त्यांच्याकडे मांडत होती. तर, उत्तम आरोग्य आणि सुखी समाज याकरीता पुणेकरांनी प्रार्थना देखील केली.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुलसीविवाह सोहळ्याचे. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सुर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, उल्हास भट, विजयराव चव्हाण, संतोष रसाळ, गजानन धावडे, तानाजी शेजवळ, लक्ष्मीबाई रासने, संगीता रासने, राजश्री गोडसे, माधुरी सासवडे, साखरे महाराज मठाचे विनायक मोडक, वंदना मोडक, सुनिता मोडक, मंदार मोडक यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष होते. शामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले.
दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करीत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगडया घालत फेर धरुन महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. प्रभात बँड आणि दरबार ब्रास बँड देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
रांगोळीच्या पायघडयांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठया संख्येने हजेरी लावली.


फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुलसीविवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पुणेकर.