दिनांक :- २० जानेवारी २०२०

dagdusheth ganapati सामाजिक कार्याचा वसा घेऊन सध्याची गणेशोत्सव मंडळे कार्य करतात
महापौर मुरलीधर मोहोळ यांचे मत; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन

पुणे : दगडूशेठ गणपती ट्रस्टने अनेक वर्ष गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, विधायक उपक्रमांमुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच जय गणेश पालकत्व योजनेअंतर्गत ट्रस्टतर्फे गरीब, गरजू पण गुणवंत विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वांनी संघटित व्हावे यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली. स्वातंत्र्यप्राप्तीचे कार्य जरी पूर्ण झाले असले तरी त्यानंतर सामाजिक कार्याचा वसा घेऊन सध्याची गणेशोत्सव मंडळे कार्य करीत आहेत, असे मत व्यक्त करीत शहरातील, उपनगरामधील गरीब, गरजू, महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा शैक्षणिक उपक्रमासाठी त्या त्या भागातील चांगल्या गणेशोत्सव मंडळांना मोफत उपलब्ध करून देईन असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन नवीन मराठी प्रशाला येथे करण्यात आले होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, अरुण भालेराव उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, आरोग्यसेवा, सामाजिक कार्य, विधायक कार्य या सगळ्या क्षेत्रामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले जात आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या या पुणे शहरात आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून तात्यासाहेब गोडसे यांच्या मनात ही कल्पना आली आणि तात्यांनतरसुद्धा ही परंपरा, हा वारसा आपण सगळेजण जपत आहात. समाजातील गरीब कुटुंबातील उत्तम मुले जी पुढे आपल्या समाजाचे नेतृत्व करू शकतील, या देशाचा चांगला नागरिक बनू शकेल अशी मुले यासाठी निवडली. विद्यार्थ्यांनी देखील याची जाणीव ठेवून आपल्या शहराचे, राज्याचे, देशाचे नाव मोठे करावे.

अशोक गोडसे म्हणाले, जय गणेश ज्ञानवर्धन अभियाना अंतर्गत १० वर्षांपूर्वी जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना या उपक्रमाला सुरुवात झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु शैक्षणिकदृष्ट्या चांगला असलेल्या विद्यार्थी घडविण्याचे काम या माध्यमातून केले. गणपती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी काहितरी केले पाहिजे. या भावनेतून उपक्रमास सुरुवात झाली. आलेला पैसा समाजाचा आहे तो समाजाच्याच उपयोगी पडला पाहिजे, या विचारातून ट्रस्टतर्फे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन नवीन मराठी प्रशाला येथे करण्यात आले होते. यावेळी पारितोषिक विजेते विद्यार्थी व मान्यवर.

DSC_8906
DSC_8903
DSC_8902
DSC_8900