दिनांक :- १९ मार्च २०१८

dagdusheth ganapati
चिरतरुण अजरामर मराठी गीतांची रसिकांवर मोहिनी
संगीतककार व गायक श्रीधर फडके यांचे सादरीकरण; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे संगीत महोत्सव; फिटे अंधाराचे जाळे – कार्यक्रम

पुणे : फिटे अंधाराचे जाळे… सांज ये गोकुळी… रुपे सुंदर सावळा गे माये… सखी मंद झाल्या तारका… तोच चंद्रमा नभात… अशा मराठी भावगीत, भक्तीगीतांचा सुरेल प्रवास रसिकांनी अनुभविला. फिटे अंधाराचे जाळे या कार्यक्रमातून गायक व संगीतकार श्रीधर फडके यांनी आजही चिरतरुण असलेल्या अजरामर मराठी गीतांची मोहिनी रसिकांवर घातली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिटे अंधाराचे जाळे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात छत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा मार्गदर्शक अनंता शेळके यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ग. दि. माडगूळकर यांनी लिहीलेल्या आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या देव देव्हा-यात नाही… या भक्तीगीताने झाली. यानंतर संत ज्ञानेश्वरांची रचना असलेल्या श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या देवाचीये द्वारी उभा क्षणभरी… या अभंगाच्या सादरीकरणाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या अशी पाखरे येती… या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.

माता भवानी जगताची जननी… या गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली. प्रभु रामचंद्रांवर आधारित आणि लोकसंगीताचा वापर करून संगीतबद्ध केलेल्या अहोजी अहोजी रामराया… या गीतावर रसिकांनी ठेका धरला. अनिल कांबळे यांनी लिहिलेल्या त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी… या गीताने रसिक अंतर्मुख झाले. रामदास स्वामींची रचना असलेले ताने स्वर रंगवावा… या गीताला रसिकांनी भरभरुन दाद दिली. या गीतामध्ये बासरी, तबला व इतर तालवाद्ये यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.

गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि शेफाली कुलकर्णी- साकुरीकर यांनी सहगायन केले. तुषार आग्रे (तबला), अतुल माळी (की-बोर्ड), नीलेश देशपांडे (बासरी), आदित्य आपटे (तालवाद्ये) यांनी साथसंगत केली. सुकन्या जोशी यांनी निवेदन केले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सादरीकरण करताना संगीतकार व गायक श्रीधर फडके आणि सहकलाकार.