दिनांक :- १९ एप्रिल २०१८

अक्षयतृतीयेनिमित्त ‘दगडूशेठ’ ला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; ससून रुग्णालय, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र, कोंढव्यातील बालसंगोपन केंद्र व वृद्धाश्रमात होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप.

पुणे : अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. मंगलमूर्तींच्या भोवती केलेली आंब्यांच्या आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती आणि स्वराभिषेकातून गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवाले यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.

यापूर्वी पहाटे ४ वाजता प्रख्यात गायक संजीव मेहेंदळे यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल…जय शंकरा… अबिर गुलाल उधळीत रंग…तू सुखकर्ता तू दुखहर्ता… यांसारखी एकाहून एक सरस भक्तीगीते यावेळी सादर करण्यात आली. अभिजीत जायदे (तबला), दिप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), प्रसाद भांडवलकर (पखवाज) यांनी साथसंगत केली.

सकाळी ८ वाजता देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या हस्ते विशेष गणेशयाग झाला. तर, विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रातील जवानांना, कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील मुले व वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना देण्यात येणार आहे, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अक्षयतृतीयेनिमित्त मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.