दिनांक :- १८ मे २०१९

dagdusheth ganapati
वैशाख पौर्णिमेनिमित्त शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ चे बाप्पा विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; पुष्टिपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त शहाळे महोत्सव – ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

पुणे : वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने दगडूशेठ गणपती मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त आयोजित शहाळे महोत्सवात तब्बल ५ हजार शहाळ्यांमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. नारळाची प्रतिकात्मक झाडे आणि शहाळ्यांनी सजविलेला मंदिराचा परिसर पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. अक्कलकोटचे अ‍ॅड. रवींद्र खैराटकर यांनी गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला. राजेशकुमार सांकला यांच्या हस्ते गणेश जन्माची पूजा झाली. शनिवारी सूर्योदयाच्या वेळी सकाळी ६ वाजून ०५ मिनीटांनी गणेशजन्म सोहळा दिमाखात पार पडला. पहाटे पं. शौनक अभिषेक यांनी स्वराभिषेकाच्या माध्यमातून गायनसेवा अर्पण केली. तसेच गणेशयाग आणि सत्यविनायक पूजा देखील मंदिरामध्ये झाली.

शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार होय. श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये याचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात श्री पुष्टीपती विनायक जयंती (गणेशजन्म) निमित्त शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी तब्बल ५ हजार शहाळे आणि झाडांची आरास करण्यात आली. तसेच गणेशजन्म पूजा करताना मान्यवर व ट्रस्टचे विश्वस्त.

DA07
DA05
DA02
DA04
DA01
DA13
DA03
DA10