दिनांक :- १८ मार्च २०१८

dagdusheth ganapati
‘दगडूशेठ’ ट्रस्टमुळे खडकवासला व ससूनमध्ये सकारात्मक बदल
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे गौरवोद्गार; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळतर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : ससून रुग्णालयात घडलेला सकारात्मक बदल हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टमुळे झाला आहे. त्याचप्रमाणे खडकवासला धरणात साठलेला गाळ काढण्याचे काम देखील ट्रस्टच्या माध्यमातून झाले आहे. सरकारच्या आधी दगडूशेठ ट्रस्टने पुढाकार घेऊन हे कार्य केले. त्यामुळे दगडूशेठ हे देशाचे सांस्कृतिक वैभव आहे, असे गौरवोद्गार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग मित्रमंडळ तर्फे गणपती मंदिराच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा येथे करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, हेमंत रासने, कुमार वांबुरे, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत मगर, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, पुण्यामध्ये गणेशोत्सवाला खूप महत्त्व असून गणेशोत्सवाचे प्रमुख स्थान पुणे आहे. सामाजिक भान ठेवून ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. धार्मिक, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात ट्रस्टचे कार्य निष्ठेने चालू आहे. सामाजिक क्षेत्रात ट्रस्टचे हेच कार्य इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपती मंदिराला ३४ वर्षे पूर्ण झाली. ट्रस्टतर्फे दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवात अनेक दिग्गज आपल्या कलेद्वारे गणरायाच्या चरणी सेवा अर्पण करतात. गणपती मंदिराच्या दानपेटीतील दान सामाजिक कार्यासाठी, लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी वापरले पाहिजे, अशी ट्रस्टची व कार्यकर्त्यांची धारणा आहे, असेही त्यांनी सांगितले.

महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी भिमण्णा जाधव व सहका-यांचे सुंद्रीवादन झाले. जितेंद्र भुरुक व रेशमी मुखर्जी यांनी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या हम दोनो दो प्रेमी…, जाने कैसे कब कहा… अशा विविध गाण्यांनी रसिकांची मने जिंकली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित मान्यवर. तसेच सादरीकरण करताना भिमण्णा जाधव, जितेंद्र भुरुक व रेशमी मुखर्जी.