दिनांक :- १८ मार्च २०१८

dagdusheth ganapati
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची आरास
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ३४ वा वर्धापनपदिन; परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ.बसवराज तेली यांची उपस्थिती

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी, रांगोळीच्या पायघडया अशा मंगलमय वातावरणात गुढीपाडवा मोठया उत्साहात साजरा झाला. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ.बसवराज तेली व पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांच्या हस्ते गणरायाची आरती करुन गुढीपूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस माणिक चव्हाण, दत्तोपंत केदारी, राजाभाऊ घोडके, उल्हास भट आदी उपस्थित होते. प्रभात बँड व दरबार बँडमधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेशयागही आयोजित करण्यात आला होता.

डॉ.बसवराज तेली म्हणाले, चांगल्या कामाची नवी सुरुवात करण्याकरीता सर्वांना यश मिळावे. समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि केलेल्या कष्टांचे फलित मिळावे, अशी प्रार्थना आम्ही गणरायाचरणी करीत आहोत. नव्या वर्षाची सुरुवात चांगल्या कामांनी करुन समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम करण्याकरीता प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्याला मंदिरात गुढीपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर. मंदिरावरील आरास.