दिनांक :- १८ जून २०१९

dagdusheth ganapati
तहानलेल्या गावांमध्ये चारा आणि पाण्याच्या माध्यमातून पोहोचली ‘दगडूशेठ’ ची जलगंगा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा पुढाकार ; माण, पुरंदर, जेजुरी, वाल्हे परिसरातील अनेक गावांना चारा व पाण्याच्या माध्यमातून मदतीचा हात

पुणे : रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करणा-या महिला आणि आभाळाकडे आशेने डोळे लावून बसलेला शेतकरी असे चित्र केवळ मराठवाडयातील गावांमध्येच नाही, तर पुण्याजवळील माण, पुरंदर, वेल्हा परिसरात देखील दिसत आहे. दुष्काळामुळे माणसांसह जनावरांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील गावक-यांसह जनावरांना दिलासा देण्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने गेल्या अनेक वर्षांपासून पुढाकार घेतला आहे. पुण्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाºया माण, पुरंदर, वेल्हा सह आजूबाजूच्या दुष्काळग्रस्त भागातील तब्बल २५ गावे, वाड्या, वस्त्यांपर्यंत पाणी आणि चारा पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष दूर होऊन या गावांना जलसंजिवनी मिळाली आहे.

माण तालुक्यातील लोधावडे, मोही, रानंद, शिरवली या भागात दिवसाला ३ टँकर आठवड्यातून वेगवेगळ््या वेळी पोचविण्यात येतात. माणसह पुरंदर तालुक्यातील राखगाव, पवार कॉलनी, महादेव वस्ती, कापडदरा, बाळाजीची वाडी, अंबाडीची वाडी, जेजुरीमधील आंबीड, नावळी चारा छावणी,नरवीर तानाजी मालुसरे गोशाळा, आंबेड या ठिकाणी जनावरांसाठी चारा देण्यात येत आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, माण व पुरंदर सह वाल्हे ग्रामपंचायतीत वाल्हे परिसर, आबाची वाडी, मुकादम वाडी, गायकवाड वाडी या ठिकाणी टँकरने पाणी पोहोचविण्यात येत असल्याने ग्रामस्थांना दुष्काळापासून दिलासा मिळाला आहे. वाघदरवाडी ग्रामपंचायतीत बाळाजीची वाडी, बहिर्जीची वाडी येथे तर पिंगोरी ग्रामपंचायतीत शिंदेनगर आणि कवडेवाडी गावात ट्रस्टकडून पाणी पुरविण्यात येते. राखगाव ग्रामपंचायतीत रणनवरे वाडी, कापडदरा राख गावठाण तसेच कर्नलवाडी ग्रामपंचायतीत गिरप वाडी आणि येवलेवाडी ग्रामपंचायतीत अंतुलेनगर येथे कुष्ठरोगी बांधवांसाठी पाणी पुरविले जात आहे. यामुळे या भागातील पाणी व चा-याची समस्या दूर झाली आहे.

पुरंदरमधील ग्रामस्थ माली रणनवरे म्हणाल्या, श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टतर्फे अत्यंत सुंदर अशी टँकरची सेवा आम्हाला सुरु आहे. सरासरी पाच वर्षांपासून ही सेवा ट्रस्टतर्फे दिली जाते. ग्रामस्थांकडून मागणी केल्यानंतर त्वरीत चांगली सेवा दिली जाते. वाडया-वस्त्यांसह गावाच्या कानाकोप-यात पाणी पुरविण्यात येते. यामुळे ग्रामस्थांसह गावातील जनावरांना देखील दिलासा मिळाला आहे.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने गेल्या अनेक वर्षांपासून पुढाकार घेत पुण्यापासून काही किलोमीटरच्या अंतरावर असणाºया माण, पुरंदर, वेल्हा सह आजूबाजूच्या दुष्काळग्रस्त भागातील तब्बल २५ गावे, वाड्या, वस्त्यांपर्यंत पाणी आणि चारा पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष दूर होऊन या गावांना जणू जलसंजिवनीच मिळाली आहे.

G001
G002
G003