दिनांक :- १७ सप्टेंबर २०१८

dagdusheth ganapati
‘दगडूशेठ’ गणपतीसमोर सुरक्षित वाहतुकीची शपथ व प्रार्थना
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या ६०० सदस्यांचा सहभाग

पुणे : आम्ही वाहतुकीचे नियम पाळू… अपघातमुक्त वाहतुकीसाठी स्वयंशिस्तीने वाहने चालवू आणि इतरांनाही वाहतुकीचे नियम पाळण्यास उद्युक्त करु, अशी शपथ घेत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या ६०० सदस्यांनी पुण्यात अपघातमुक्त वाहतूक व्हावी याकरीता दगडूशेठ गणपतीसमोर प्रार्थना केली. वाहतूक समस्यांवर उपाययोजना आखत क्लब रस्त्यावर उतरुन जनजागृती करणार असल्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पुढाकाराने रोटरी क्लबच्या सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी ट्रस्टचे बाळासाहेब सातपुते, अरुण भालेराव, रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ.शैलेश पालेकर, डॉ.शोभना पालेकर, रोटरी सिंहगड रोडचे डॉ.श्रीकांत पाटणकर, यशवंत कुलकर्णी, सतिश खाडे, शरद देशपांडे, सुनील जाधव, कमलजीत कौर आदी यावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे हे ५ वे वर्ष आहे.
रोटरी क्लबच्या सदस्यांनी यावेळी डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावर आम्ही वाहतुकीचे नियम पाळू, असा संदेश देण्यात आला होता. महिलांसह पुरुषांनीही मोठया संख्येने सहभाग घेत, अथर्वशीर्ष पठण केले. उपस्थित भाविकांनीही यामध्ये उर्त्स्फूतपणे सहभाग घेऊन वाहतुकीच्या नियमांसंदर्भात शपथ घेतली.

फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पुढाकाराने रोटरी क्लबच्या ६०० सदस्यांनी उपक्रमात सहभाग घेत, वाहतुकीचे नियम पाळू अशी शपथ घेतली.