दिनांक :- १७ सप्टेंबर २०१८

dagdusheth ganapati
‘दगडूशेठ’ ला ३५ हजार सूर्यनमस्कारांतून विद्यार्थ्यांनी केले वंदन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; लक्ष्मी वेंकटेश चॅरिटेबल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टचा पुढाकार

पुणे : ओम् सूर्याय नम:… ओम् भास्कराय नम:… च्या मंगल स्वरांनी दगडूशेठ गणपती विराजमान असलेले श्री राजराजेश्वर मंदिर दुमदुमून गेले. मंत्रोच्चारांसोबत ७२० शालेय विद्यार्थ्यांनी तब्बल ३५ हजार सूर्यनमस्कार घालून गणरायाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने वंदन केले. स्वच्छ मनासोबतच सुदृढ शरीरसंपदेकरीता बाप्पाने आम्हाला आर्शिवाद द्यावा, ही अशी प्रार्थना यावेळी विद्यार्थ्यांनी गणरायाकडे केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात लक्ष्मी वेंकटेश चॅरिटेबल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टच्या पुढाकाराने विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी ट्रस्टचे सुनिल रासने, बाळासाहेब सातपुते, उल्हास भट, योगाचार्य प्रा.विदुला शेंडे, संस्थेचे अध्यक्ष विश्वास शेंडे आदी यावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे हे ७ वे वर्ष आहे.
विश्वास शेंडे म्हणाले, शारीरिक क्षमता वाढविणे हे सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कारणांमुळे असलेले मनोविकार आणि शारीरिक विकार यावर सूर्यनमस्कार हा उत्तम उपाय आहे. शारिरीक व्याधींतून जर विद्यार्थ्यांना मुक्तता मिळाली, तर उद्याच्या भारताचे भविष्य खूपच सुंदर असेल, असेही त्यांनी सांगितले.
मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड, महाराष्ट्र मंडळ, महेश विद्यालय, आधार मूकबधिर विद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा, विश्वकर्मा विद्यालय, वसुंधरा सेकंडरी स्कूल, माधव सदाशिव गोळवलकर विद्यालय, डी.ई.एस. विद्यालय, एन.ई.एम.एस., महापालिका शाळा क्र.१, बाल विकास मंदिर धनकवडी, विद्या निकेतन, विद्या विकास विद्यालय, ज्ञानांकूर इंग्रजी माध्यम, आयोध्या मूकबधिर विद्यालय, रेडक्रॉस मूकबधिर विद्यालय, सी.आर.रंगनाथन मूकबधिर विद्यालय, आदी शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा.विदुला शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. संजीव पाध्ये यांनी आभार मानले.

फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात थायलंडच्या लष्करप्रमुखांनी गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, देवीसिंग शेखावत यांनी देखील गणरायाचे दर्शन घेतले.