दिनांक :- १६ मे २०१९

dagdusheth ganapati
वैशाख पौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’ चा शहाळे महोत्सव
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; पुष्टिपती विनायक (गणेशजन्म) जयंतीनिमित्त ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शनिवार, दिनांक १८ मे रोजी सकाळी ८ वाजता मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांना तब्बल ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण केला जाणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता.
वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद््भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. तसेच दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे. तसेच शनिवारी पहाटे ४ वाजता गायक शौनक अभिषेक यांचा स्वराभिषेक कार्यक्रम त्यानंतर गणेशयाग आणि सत्यविनायक पूजा होणार आहे.
श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार होय. श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये याचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला असतो. त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेश विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध करतात. वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा करतात.
तरी वरील बातमीस आपल्या सुप्रसिद्ध दैनिक/ वृत्तवाहिनीवर प्रसिद्धी द्यावी. तसेच कार्यक्रमाला आपला बातमीदार व छायाचित्रकार पाठवावा, ही नम्र विनंती.