दिनांक :- १६ जुलै २०१८

dagdusheth ganapati
लहान मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी समतोल आहार गरजेचा डॉ. संजीव डोळे यांचे मत ; श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे : सध्या लहान मुलांमध्ये कॅल्शियम आणि क जीवनसत्वाची कमतरता प्रामुख्याने दिसून येते. याचे कारण म्हणजे लहान मुले शरीराला आवश्यक असा पोषक आहार घेत नाहीत. सर्दी, खोकला यांसारख्या आजारांबरोबरच प्रतिकारक्षमतेची कमतरता देखील मुलांमध्ये आढळते. निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये डाळी, कडधान्ये, पालेभाज्या, फळे यांचा समावेश असला पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी रोजच्या जेवणामध्ये समतोल आहार घेणे आवश्यक आहे, असे मत डॉ. संजीव डोळे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार पेठेतील नविन मराठी शाळेत करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, कुमार वांबुरे, दत्तोपंत केदारी, अरुण भालेराव, डॉ.विनायक रुपनवर, डॉ.व्हि.सी.कुलकर्णी, डॉ.केदारनाथ लोंगाणी, डॉ.सचिन मेहता आदी उपस्थित होते. आरोग्य शिबिरामध्ये २० डॉक्टर्सनी ५५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ. संजीव डोळे म्हणाले, जय गणेश ज्ञानवर्धन अभियानामध्ये विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल, याकडे लक्ष दिले जाते. पुण्याच्या विविध भागातील विद्यार्थी या योजनेमध्ये सहभागी आहेत. मागील अनेक वर्षांपासून हे आरोग्य शिबिर राबविले जाते. शिबिरानंतर देखील वर्षभर विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास ते या डॉक्टरांकडे जाऊन मोफत उपचार घेतात. शिबिरामध्ये बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी, आहाराविषयी मार्गदर्शन, डोळ्यांची तपासणी, मानसिक समस्या अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
अशोक गोडसे म्हणाले, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेअंतर्गत पुणे शहरातील ५२ शाळांमधील ५५० गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्याची साथ मिळावी यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिबिराचे यंदा ९ वे वर्ष आहे. शिबीरात पोटदुखी, कंबरदुखी, सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्यविषयक तक्रारींसदर्भात तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी देखील यावेळी करण्यात आली.
जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना सुरु झाल्यापासून या योजनेचा लाभ घेणारी सध्या बी.सी.एस. च्या दुस-या वर्षात शिकणारी साक्षी दगडे म्हणाली, माझी शरीरयष्टी बारीक असल्याने मला नेहमी अशक्तपणा येत असे. परंतु अभियानातील आरोग्य शिबिराचा मला खूप फायदा झाला. शिबिरात येणा-या डॉक्टरांनी मला औषधोपचार दिल्याने माझा अशक्तपणा दूर झाला. त्यामुळे माझी एकाग्रता वाढली, माझ्यातील आत्मविश्वास देखील वाढला, असेही तिने सांगितले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शनिवार पेठेतील नविन मराठी शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना डॉक्टर्स आणि उपस्थित मान्यवर.