दिनांक :- १४ मे २०१८

गणपती बीजमंत्र जप यज्ञ सोहळा बुधवारपासून रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजन जगभरातील गणेशभक्तांनी आपापल्या घरातून घ्यावा सहभाग

पुणे : यंदाचा अधिकमास बुधवार, दिनांक १६ मे ते बुधवार, दिनांक १३ जून या कालावधीमध्ये आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने पुण्यप्रद अशा श्री गणेशाच्या ॐ गं गणपतये नम: या बीजमंत्राच्या जप यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्याचा संकल्प १६ मे रोजी सकाळी ८ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन श्री गणेशाच्या ॐ गं गणपतये नम: या बीजमंत्राचा जप करुन भाविक गणेशचरणी सेवा अर्पण करु शकणार आहेत. जपाची एक माळ म्हणजे १०८ मणी होत. या माळेच्या सहाय्याने मंत्रौच्चारण करुन गणेशभक्त जप यज्ञात होणार आहेत.

जप यज्ञात भाविकांनी आपापल्या घरातून देखील सहभाग घेता येणार आहे. रोज किमान १ माळ म्हणजेच १०८ मणी असा जपा भाविकांनी करावा. यादरम्यान मंदिर रोज सकाळी ६ ते रात्री १०.३० पर्यंत खुले आहे. तरी गणेशभक्तांनी या जप यज्ञ सोहळ्यात मंदिरात येऊन अथवा आपापल्या घरातून मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.