दिनांक :- १४ मे २०१८

डान्स महाराष्ट्र डान्समधील पुण्याच्या संघाचे ‘दगडूशेठ’ ला साकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ; पुण्यातील ओम डान्स अ‍ॅकॅडमीतील कलाकारांनी केली आरती

पुणे : नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविण्या-या पुण्यातील ओम डान्स अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी दगडूशेठ गणपती चरणी साकडे घातले. झी युवा वाहिनीवर सुरु असलेल्या डान्स महाराष्ट्र डान्स या नृत्यस्पर्धेतील निर्णायक फेरीत पुण्याच्या संघाने धडक मारली असून विजेतेपदाचा मानाचा तुरा पुण्याच्या शिरपेचात खोवला जावा, यासाठी बाप्पाचरणी कलाकारांनी प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अ‍ॅकॅडमीचे ओंकार शिंदे यांसह कलाकार उपस्थित होते. ओम डान्स अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी गणपतीची आरती करण्यासोबत अभिषेकही केला.

ओंकार शिंदे म्हणाले, आम्ही गणपती बाप्पाचे मोठे भक्त आहोत. ओम डान्स अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी या नृत्यस्पर्धेत प्रत्येक फेरीत चांगली कामगिरी केली आहे. सरावातील सातत्य आणि पुणेकरांचे पाठबळ यामुळे आमची वाटचाल निर्णायक फेरीपर्यंत पोहोचली आहे. बाप्पाचे आशिर्वाद असेच आमच्यावर कायम राहो आणि ही स्पर्धा जिंकून आम्हाला पुण्याचे नाव उंचावण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. बालकलाकारांसोबत त्यांचे पालकही मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत पुण्यातील ओम डान्स अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी गणपतीची आरती केली. झी युवा वाहिनीवर सुरु असलेल्या डान्स महाराष्ट्र डान्स या नृत्यस्पर्धेतील निर्णायक फेरीत पुण्याच्या संघाने धडक मारली असून त्यामध्ये यश मिळावे, असे साकडे यावेळी कलाकारांनी बाप्पाचरणी घातले.