दिनांक :- १३ सप्टेंबर २०१८

dagdusheth ganapati
‘राजराजेश्वर मंदिरात ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते विद्युतरोषणाईचे उद््घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला सायंकाळी सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद््घाटन होताच पुणेकरांनी बाप्पाचे मनोहारी रुप आणि लाखो दिव्यांनी उजळलेले राजराजेश्वर मंदिर मोबाईलच्या कॅमे-यामध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी केली.
उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद््घाटन झाले. यावेळी पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त आशु जैन, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सुर्यवंशी, हेमंत रासने, उल्हास भट, राजेश सांकला, मंगेश सुर्यवंशी, सुनील जाधव यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक गोडसे म्हणाले, अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघाले आहे. अत्याधुनिक लाईटस्ने विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले, रंगकाम सुनील प्रजापती यांनी केले आहे. ट्रस्टच्या यार्षीच्या श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून ९० फूट उंची आहे.

* गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच
पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद््दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक १२ ते २४ सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची १५० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नानाविध उपक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांची सर्व माहिती ट्रस्टच्या www.dagdushethganpati.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅपवर देखील माहिती उपलब्ध आहे. यापुढील गणेशोत्सवातील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत सर्वांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

फोटो ओळ :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिर प्रतिकृती साकारण्यात आली आहे. याचे उद््घाटन खासदार अनिल शिरोळे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.