दिनांक :- १३ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
‘भावसरगम’ मधून गाजलेल्या मराठी गीतांचा नजराणा
पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर व विभावरी आपटे-जोशी यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवात भावसरगम कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शौर्य गीतांपासून भावगीते,भक्तीगीते, कोळीगीते अशा विविध गीतांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ संगीतकार व गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर व विभावरी आपटे जोशी यांनी रसिकांवर स्वरवर्षाव केला. गाजलेल्या मराठी गीतांमध्ये रमलेल्या स्वरमयी संध्येची रसिकांनी अनुभूती घेतली. यानिमित्ताने रसिकांना नानाविध गीतांचा अनमोल नजराणा अनुभवण्याची संधी मिळाली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर व राधा मंगेशकर यांचा भावसरगम या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. यावेळी कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरातील नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, माणिक चव्हाण, कुमार वांबुरे, राजेंद्र सुर्यवंशी, राजाभाऊ घोडके, श्रीकांत प्रधान, अधीश पायगुडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जय देव जय देव जय जय श्री शिवराया… या स्वा. सावरकरांची रचना असलेल्या आरतीने झाली. यानंतर गुणी बाळ असा…, हे हिंदूशक्ती संभूत दिप्तीतम् तेजा…, म्यानातून उसळे तलवारीची पात… उष:काल होता होता काळरात्र झाली… अशा शौर्य गीतांनी उपस्थितांच्या मनात स्फुरण चढले. गझल प्रकारातील केव्हातरी पहाटे… या गीताने राधा मंगेशकर यांनी उपस्थितांची मने जिंकली. असा बेभान हा वारा… या गीतामधून सिंथेसायझरचा आविष्कार रसिकांनी अनुभवला. अवचिता परिमळू… या गायिका विभावरी आपटे यांनी सादर केलेल्या गीताने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मी डोलकर…, गोमू संगतीन…, आम्ही ठाकर ठाकर… अशा गीतांमधून पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजाची ताकद रसिकांनी अनुभवली. वही जाओ जाओ बलमा… या गीताच्या सादरीकरणातून तबला व मृदुंग यांची अनोखी जुगलबंदी रसिकांच्या मनात घर करून गेली.
ज्येष्ठ संगीतकार व गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर व विभावरी आपटे- जोशी यांनी गीतांचे सादरीकरण केले. विवेक परांजपे व दर्शना जोग (सिंथेसायझर), डॉ. राजेंद्र दूरकर व विशाल गंड्रत्वार (तबला) यांनी साथसंगत केली.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. महोत्सवाची सांगता भावसरगम या कार्यक्रमाने झाली. यावेळी सादरीकरण करताना ज्येष्ठ संगीतकार व गायक पं. ह्रदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर व गायिका विभावरी आपटे- जोशी.

H 7
H 6
H 5
H 4
H 3
H 2
H 1