दिनांक :- १२ फेब्रुवारी २०२०

dagdusheth ganapati मधुमेह व अस्थिरोग निवारण शिबीरात २ हजार रुग्णांची तपासणी-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन; आई जगदंबा हेल्थकेअर चा पुढाकार – रुग्णांवर विनामूल्य उपचार

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व आई जगदंबा हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह व अस्थिरोग निवारण शिबिराचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले होते. शिबीरात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या २ हजारहून अधिक रुग्णांची विनामूल्य तपासणी करीत त्यांच्यावर यशस्वी उपचार देखील करण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गणपती सदन इमारतीमध्ये हे दहा दिवसीय शिबीर घेण्यात आले. शिबीराच्या समारोपप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, बाळासाहेब सातपुते, राजाभाऊ घोडके, आई जगदंबा हेल्थ केअरचे विख्यात मेडिकल अ‍ॅस्ट्रॉलॉजर संजय कुलकर्णी, सोनल कुलकर्णी, डॉ. मिनाक्षी पंडित, राहुल टोपले, डॉ.रुचा राजापूरकर आदी उपस्थित होते. डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज आॅफ फिजिओथेरपी पिंपरी पुणेच्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. शिबीरात १२०० अस्थिरोग व ८०० हून अधिक मधुमेहाच्या रुग्णांची तपासणी झाली.

संजय कुलकर्णी म्हणाले, औषधांऐवजी औषधांविना आजार बरे करण्यावर आपण भर द्यायला हवा. कोणत्याही क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची असून पैसा व संपत्ती महत्त्वाची नाही. अध्यात्मात माणुसकी शिकायला मिळते. त्यामुळे रुग्णांच्या काळजाला भिडेल, अशा प्रकारे उपचार करुन आपण त्यांचे आजार दूर करायला हवे. सिद्धी हे सर्व गोष्टींचे उत्तर आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक अभ्यास करीत अनुभव घेत आपण सिद्धी प्राप्त करायला हवी.

अशोक गोडसे म्हणाले, समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नाहीत, यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दररोज २०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून आम्ही जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून काम करीत आहोत. आज उपचारपद्धती व आजारांमध्ये देखील बदल झाले आहेत. त्यामुळे काळानुसार रुग्णांवर आवश्यक विनामूल्य उपचार देण्याचा यामाध्यमातून आम्ही प्रयत्न केला आहे.

तब्बल २५ डॉक्टरांनी या शिबिरात काम केले. जास्तीत जास्त व्यायामप्रकार देऊन दुखणे घालवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. तसेच साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ती घालवण्यासाठी देखील उपचार करण्यात आले होते. पुण्यासह -सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, बार्शी यांसह विविध भागांतून रुग्ण उपचाराकरीता पुण्यामध्ये आले होते.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने गणपती सदन येथे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व आई जगदंबा हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह व अस्थिरोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समारोपप्रसंगी आई जगदंबा हेल्थ केअरचे विख्यात मेडिकल अ‍ॅस्ट्रॉलॉजर संजय कुलकर्णी व सहका-यांचा सन्मान करताना ट्रस्टचे विश्वस्त.

j03
j02
j01