दिनांक :- १० एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
अजरामर गीतांच्या सादरीकरणातून बर्मन पिता-पुत्रांच्या आठवणींना उजाळा
प्रख्यात गायक जितेंद्र भुरुक यांचे सादरीकरण ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवात तुम आ गये हो कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळातील अलौकिक प्रतिभा सामावलेल्या अजरामर गीतांचा खजिना प्रख्यात गायक जितेंद्र भुरुक यांनी रसिकांसमोर उलगडला. सचिन देव बर्मन व राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या विविध छटांच्या गीतांचे सादरीकरण अनुभवत रसिक तृप्त झाले. विविधरंगी गीतांच्या सादरीकरणातून बर्मन पिता-पुत्रांची सांगीतिक कारकीर्द उलगडत त्यांच्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा दिला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रख्यात गायक जितेंद्र भुरुक व सहकलाकारांचा तुम आ गये हो.. हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात नौजवान चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी रचलेल्या ठंडी हवाये लहराके गाये… या गीताने झाली. यानंतर अभिलाशा चित्रपटातील वादिया मेरा दामन… या गीताला रसिकांनी दाद दिली. रंगीला रे… या गीतामधून मानवी भावभावनांप्रमाणे करण्यात आलेल्या संगीत रचनेचे वैशिष्ट्य रसिकांनी अनुभवले. विविध वाद्यांचा वापर करून संगीतबद्ध केलेल्या बचना ए हसीनो… या गीताद्वारे प्रेक्षकांमधून प्रवेश करीत गायक जितेंद्र भुरुक यांनी उपस्थितांना थक्क केले. शिट्टी आणि माऊथ आॅर्गनचा वापर करून संगीतबद्ध केलेल्या हे अपना दिल तो आवारा… या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली.
हम थे वो थी और समा रंगीन समझ गये ना… एक मै और एक तू… आज मदहोश हुवा जाये रे… पाच रुपय्या बारा आना… अशा विविध गीतांनी रसिकांची मने जिंकली. बाटलीच्या आवाजाचा अप्रतीम वापर करून संगीतबद्ध केलेल्या रुक जाना ओ जाना… या गीताला रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. वाद्यवृंदाने देखील वाद्यांची दमदार साथसंगत करत कार्यक्रमात बहार आणली. प्रख्यात गायक जितेंद्र भुरुक यांसह रफी हबीब, मृणाल रणधीर, राजेश्वरी पवार यांनी गीतांचे सादरीकरण केले. नीरजा आपटे यांनी निवेदन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये तुम आ गये हो कार्यक्रमात सादरीकरण करताना प्रख्यात गायक जितेंद्र भुरुक व सहकलाकार.

B 9
B 8
B 6
B 5
B 3
B 2
B 7