दिनांक :- १० सप्टेंबर २०१९

dagdusheth ganapati श्री विकटविनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १२७ वे वर्ष तब्बल १ लाख २१ हजार एलईडी बल्बमध्ये साकारलेला रथ; मिरवणुकीत हजारो गणेशभक्त होणार सहभागी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला गुरुवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री विकटविनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून १ लाख २१ हजार एलईडी बल्बमध्ये हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री विकटविनायक रथ हा यंदाची सजावट असलेल्या श्री गणेश सूर्यमंदिर संकल्पनेला सुसंगत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

श्री विकटविनायक रथावर ८ खांब साकारण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २२ फूट इतकी आहे. रथावर १ मुख्य कळस बसविण्यात आला आहे. एलईडीमध्ये हा रथ साकारण्यात आला आहे. मुंबईहून लाईटस्च्या रंगसंगतीकरीता साहित्य आणण्यात आले आहे. सप्तरंगांमध्ये विविध लाईटस् वापरण्यात आले आहे. भारतीय बनावटीचे १ लाख २१ हजार एलईडी बल्ब वापरण्यात आले आहेत, हे यंदाच्या रथाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. रथावर तिरंगी रंग देखील पूर्णवेळ असणार आहे.

मुद््गल पुराणात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. या अवतारांमध्ये वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण यांचा समावेश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या मत्सर,मद, मोह,लोभ, क्रोध, काम, अहंकार, अभिमान आदी विकारांवर विजय मिळवायचा असेल, तर गणराज शरणता असा या सर्व अवतारांचा भावार्थ आहे. विकट हा सहावा अवतार असून तो सूर्याचे प्रतिक आहे. त्याने कामासुराचा वध केला, अशी कथा मुद््गल पुराणात वर्णिली असून हे कथासूत्र या रथाच्या देखाव्याची पार्श्वभूमी आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना अशोक गोडसे म्हणाले, मिरवणुकीत मानवसेवा रथ असणार आहे. त्यात सामाजिक विषय मांडले जातील. यावर्षी लोकसहभाग आणि गणेश मंडळाच्या पुढाकारातून नदीचे रक्षण असा विषय मांडला जाईल. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

about dagdusheth ganapatiप्रसिद्धीसाठी PDF येथे डाऊनलोड करा

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाच्या सांगता मिरवणुकीकरीता तब्बल १ लाख २१ हजार एलईडी बल्बने साकारलेला श्री विकटविनायक रथ.

P001
P006
P005
P004
P003
P002
J11
J06
J05