दिनांक :- ९ एप्रिल २०१९

dagdusheth ganapati
‘फिटे अंधाराचे जाळे’ मधून पुणेकरांनी घेतला श्रवणानंद
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळातर्फे मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवात फिटे अंधाराचे जाळे या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके उर्फ बाबुजी, शांता शेळके, सुधीर मोघे आणि बाबुजींचा वारसा देखण्या वाटेने चालविणारे गायक व संगीतकार श्रीधर फडके यांनी साकारलेल्या विविध गीतांच्या सादरीकरणाने रसिकांनी श्रवणानंद घेतला. झाला महार पंढरीनाथ सारख्या चित्रपटातील गाजलेल्या गीतांपासून ते माता भवानी जगताची जननी… या श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या नव्या रचनेपर्यंत एकाहून एक सरस गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रीधर फडके यांच्या फिटे अंधाराचे जाळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ग.दी.माडगूळकर यांनी रचलेल्या झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील देव देव्हा-यात नाही… या गीताने झाले. त्यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या देवाचिये द्वारी या गीताच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. राम फाटक यांच्या संगीताने सजलेले सखी मंद झाल्या तारका या गीताने कलाकारांना संगीताच्या दुनियेची सफर घडविली.
फिटे अंधाराचे जाळे हे सन १९८२ साली आलेल्या लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील गीत कार्यक्रमात सादर होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. देवीच्या रुपांवर स्वरांकीत केलेले थोरली जाऊ या चित्रपटातील आदिमाया अंबाबाई सा-या दुनियेची आई हे गीत गायिका शिल्पा पुणतांबेकर आणि शेफाली कुलकर्णी-साकोरीकर यांनी सादर केले. तूच चंद्रमा नभात…धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना…तेजोमय नादब्रह्म हे…तुज नमो…या कोवळया फुलांना…एक धागा सुखाचा… या गाण्यांना देखील उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
गायक श्रीधर फडके, शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी-साकोरीकर यांनी सादरीकरण केले. केदार परांजपे (सिंथेसायझर), निलेश वैद्य (बासरी), तुषार आग्रे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. सुकन्या जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे दगडूशेठ गणपती मंदिराच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. यामध्ये फिटे अंधाराचे जाळे कार्यक्रमात सादरीकरण करताना (डावीकडून) शेफाली कुलकर्णी – साकोरीकर, श्रीधर फडके, शिल्पा पुणतांबेकर आदी.

TU01
TU02
TU03
TU04
TU05
TU06
TU07
TU08